अमरावती/दि. २१ – दिनांक 22 ऑगस्ट,2020 ते दिनांक 2 सप्टेंबर,2020 या दरम्यान गणपती उत्सव सुरुवात व विसर्जनाचा कालावधी आहे. त्याअनुषंगाने मा.आयुक्त महोदय यांच्या कक्षामध्ये आज दिनांक 21 ऑगस्ट,2020 रोजी सर्व अधिका-यांसमवेत सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस मनपा आयुक्त प्रशांत रोडे, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रविंद्र पवार, कार्यकारी अभियंता 2 सुहास चव्हाण, उद्यान अधिक्षक मुकुंद राऊत, उपअभियंता प्रमोद इंगोले, भास्कर तिरपुडे, श्री तायडे, तौसिफ काझी उपस्थित होते.
गणेशोत्सवनिमित्त सर्व विभाग प्रमुख व खाते प्रमुख यांना सोबत जोडलेल्या आदेशाप्रमाणे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. गणेशोत्सवानिमित्त गणेश मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत कार्यवाही शहर अभियंता विभागातून करण्यात येत आहे. कृत्रिम घरगुती गणपती विसर्जनाकरीता मनपा क्षेत्रामध्ये बडनेरा झोन कार्यालय, नवाथे चौक, बडनेरा नाका, प्रशांत नगर उद्यान, नवोदय विद्यालय, नेहरु मैदान, मालटेकडी, छत्रीतलाव, प्रथमेश तलाव, अभियंता भवन तसेच एकुण 10 ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे.
गणेशोत्सावानिमित्त मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या कापण्याचे काम उद्यान विभागाकडुन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे गणेश विसर्जनाकरीता गणेश मंडळाच्या मोठ्या गणपती विसर्जनाकरीता 80 फुट लांब x 20 फुट रुंद व 8 फुट खोल खड्यांची निर्मिती छत्री तलाव येथे करण्यात येत आहे. मनपा मार्फत मोठ्या गणपती विसर्जनाची तयारी छत्री तलाव येथे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घरगुती विसर्जनाची त्याकरीता 50 फुट x 20 फुटाचा खड्डा करुन कृत्रिम तलावाची निर्मिती सुध्दा करण्यात येत आहे. प्रथमेश तलाव येथे सुध्दा दरवर्षीप्रमाणे विसर्जनाबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.