दस-याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील डॉक्टरांच्या पुढाकाराने
संत्रानगरीत आजपासुन कोविड रुग्णालय सुरु
वरुड/दि.२४ – गेल्या ७ महिन्यांपासुन कोरोनाने संपुर्ण जगात थैमान घातले असतांना गेल्या काही दिवसांपासुन जिल्हा स्तरावरील रुग्णालये हाऊसफुल्ल असल्यामुळे वरुड शहर व तालुक्यातील होत असलेली गैरसोय लक्षात घेता वरुड शहरातील डॉक्टरांनी पुढाकार घेवुन शहरात कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्या २५ ऑक्टोबर म्हणजे दस:याच्या शुभ मुहुर्तावर या कोविड रुग्णालयाची मुहुर्तमेढ रोवल्या जाणार आहे.
धनोडी रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोशिएशनने उभारलेल्या स्व.विनायकराव गोधने स्मृती आय.एम.ए. सभागृहात हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजु होणार आहे.
तालुक्यातील नागरिकांना वरुडातच उत्तम सेवा मिळावी, वरुड शहरापासुन नागपुर आणि अमरावतीचे अंतर सरासरी ९० किलोमीटरचे असल्यामुळे आणि सद्य: स्थितीत या दोन्ही जिल्हास्तरावरील विविध कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वरुड व परिसरातील रुग्णांना या रुग्णालयात उपचार घेणे गैरसोयीचे होत असल्यामुळे इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पुढाकाराने वरुड शहरातील सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेत वरुडमध्ये कोविड रुग्णालय उभारण्याचा गेल्या १ महिन्यापुर्वी निर्णय घेतला आणि रुग्णालय उभारण्याची तयारी सुरु झाली. शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.राम गोधने यांनी त्यांचे वडील स्व.विनायकराव गोधने स्मृती आय.एम.ए. सभागृहात हे रुग्णालय उभारण्याकरिता हालचाली सुरु केल्या आणि त्याकरिता शहरातील सर्व डॉक्टरांनी पुढाकार घेतला.
कोरोना मुक्त ऑरेंजसिटी हा प्रामाणिक उद्देश ठेऊन व रुग्णांशी वर्षानुवर्षे असणारे ऋणानुबंध कायम राहावे, या उदात्त हेतून प्रेरित होऊन शासनाने दिलेल्या दिशनिर्देशाचे पालन करत बहुप्रतिक्षेत असलेल्या व सर्व अद्यावत प्रणालीने सुसज्ज अशा वरुडच्या कोविड रुग्णालयाची सेवा उद्या दस:याच्या शुभमुहूर्तावर देणे प्रारंभ होत आहे. या रुग्णालयात रुग्णासाठी कोविड -१९ (कोरोना) सोबतच सारी या रोगावर सुद्धा उपचार करण्यात येईल.
या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा उद्या २५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता धनोडी रस्त्यावरील कोविड रुग्णालयात येथे होत आहे.
या उद्घाटनप्रसंगी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
वरुडमध्ये कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आल्यामुळे अमरावती आणि नागपुर येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ये-जा करण्याचा त्रास व जिल्हास्तरावर होणारी आर्थिक लुट थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.