
मुंबई/दि.२८ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADANVIS) आणि शिवसेना नेते संजय राऊत(SANJAY RAUT) यांच्यात नेमकी भेट का झाली, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट करत रिपाईच्या रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा महायुतीत येण्याचं आवाहन केलं आहे. कोणी एकत्र यायचं असेल तर, शिवसेनेला प्राधान्य आहे. शिवसेनेनं भाजप- रिपाईसोबत यावं असं वक्तव्य त्यांनी मुंबईत पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत केलं.
इतक्यावरच न थांबता आठवले यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार यांच्यापुढंही युतीचा प्रस्ताव ठेवला. शिवसेना जर सोबत आली नाही तर, राष्ट्रवादीनं युतीसाठी एकत्र यावं असं म्हणत विकासासाठी खुद्द पवार यांनीच निर्णय घ्यावा असं ते म्हणाले.
राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो, असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं.