एटीएस आणि सासवड पोलिसांनी मारला जुगार अड्डयावर छापा
34 लाख 94 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
पुणे/दि.४– पुरंदर तालुक्यातील दिवे घाटाजवळ असलेल्या हॉटेल व्हिक्टोरिया इन इव्हिनिंग येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून 34 लाख 94 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी हॉटेलचे चालक विजय बाबुराव कोल्हापुरे यांच्यासह 30 जणांना पकडण्यात आले. त्यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल चालकाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिवे घाटाजवळ असलेल्या झेंडेवाडी जवळ व्हीके हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाला मिळाली, ही माहिती सासवड पोलिसांना देण्यात आली, यानंतर दहशतवाद विरोधी पथक व सासवड पोलिसांनी सायंकाळी पावणे सहा वाजता या हॉटेलला चारी बाजूंनी वेढा घातला, हॉटेल चालकाला ताब्यात घेऊन पोलीस तिसऱ्या मजल्यावर गेले असता त्या ठिकाणी वेगवेगळ्या टेबलांवर जुगार खेळताना 29 जण आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी जुगार अड्डा चालवणारे हॉटेल चालक विजय कोल्हापुरे यांच्यावर जुगार अड्डा चालवणे व पैसे घेऊन जुगार अड्डा चालवण्यासाठी जागा देणे याबद्दल जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, इतर 29 जणांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
यावेळी पोलिसांनी तीन कार, सहा दुचाकी, 34 मोबाईल, जुगार खेळण्याचे साहित्य असा 30 लाख 50 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 3 लाख 44 हजार 640 रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शेवाळे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक फौजदार सुनील ढगारे, पोलीस कर्मचारी राजेंद्र मिरगे, विशाल भोरडे, किरण कुसाळकर, सुनील ढगारे, ईश्वर जाधव सासवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी एस हाके, पोलीस कर्मचारी राजेश पोळ,भरत आरडे महेश उगले, आर.बी कोल्हे यांनी भाग घेतला. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांना कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर पुरंदर तालुक्यात पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जुगार, मटका व अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे .