शालेय शिक्षणात कृषी या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्यास प्रयत्नशील
पंतप्रधान नरेंद्र मोदी ने दिली माहिती
नवी दिल्ली/दि.२९- आगामी काळात शालेय शिक्षणात कृषी या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते शनिवारी झाशी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सोहळ्यात बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीक्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, शालेय स्तरावर शेतीविषयक पुस्तकी आणि प्रत्यक्ष शिक्षण देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने मध्यम शालेय स्तरावर अशाप्रकारचे शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.तसेच आपण कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची भाषा करतो तेव्हा केवळ अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणे अपेक्षित नसते. तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर करणे, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर असायला पाहिजे. शेतीच्या पारंपारिक समस्या सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. अलीकडेच देशभरात आलेल्या टोळधाडीचे उदाहरण त्यासाठी देता येईल. या काळात केंद्र सरकारने जवळपास 10 राज्यांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टोळधाडीमुळे होणारे नुकसान कमी केल्याचे मोदींनी सांगितले.