मराठी

मराठा समाजाच्या मागणीमुळे सुनावणीपासून दूर

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा दावा; वकिलांवर आरोपापेक्षा सुनावणी महत्त्वाची

मुंबई/दि. १३ – ‘मी कोर्टात बाजू मांडू नये, यासाठी मराठा समाजाने तत्कालीन सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीला मान देऊन मी मराठा आरक्षणाच्या सुनावणीपासून दूर राहिलो,  असा गौप्यस्फोट महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी केला. समाजाला अजूनही असेच वाटत असेल, तर मी यापासून संपूर्णपणे अलिप्त राहीन, असे त्यांनी सांगितले.

‘कोणत्याही वकिलावर अविश्वास दाखवू नका. मराठा आरक्षणाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. आमच्यावर होणारे आरोप पूर्ण चुकीचे आहेत. यापुढच्या कायदेशीर बाबींवरून लक्ष हटवू नका, आरक्षणाचा संपूर्ण फायदा संबंधितांना मिळाला पाहिजे. वकिलांवर आरोप करून काहीही साध्य होणार नाही, असे आरोप केल्यास याचा विपरीत परिणाम होतील’ असा इशारा कुंभकोणी यांनी दिला. ‘मी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती; मात्र तरीही याबाबत मी शक्य ती सगळी मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका, अशी विनंती मला केली. त्यामुळे फडणवीस सरकारचा मान राखून मी न्यायालयात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला’ असे त्यांनी सांगितले.

उच्च  न्यायालयात मराठा आरक्षण टिकले याला सर्वांची मेहनत कारणीभूत आहे. मी माझ्या बाजूने सर्व प्रयत्न केले आहेत. मी कुठेही यात लक्ष द्यायला कमी पडलो नाही. जर समाजाला अजूनही असे वाटत असेल, तर या प्रकरणापासून मी सर्वार्थाने बाजूला व्हायला तयार आहे.’ असे कुंभकोणी यांनी सांगितले.  ‘न्यायालयाची अंतिम लढाई अजून बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही वकिलावर वैयक्तिक टीका करु नका. मूळ मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे. त्यावरून लक्ष विचलित करू नका’ अशी विनंतीही त्यांनी मराठा समाजाला केली.

Related Articles

Back to top button