मराठी

भंडारा जिल्ह्यात पूरस्थिति झाली निर्माण

गोसेखुर्द आणि बावनथड़ी प्रकल्पाचे सोड़ले पानी

भंडारा/नागपूर/दि.३०– संततधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी तर गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील 20 गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, मोहाडी, पवनी तालुक्यातील नदी तीरावरील अनेक गावांतील घरात पुराचे पाणी शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद पडले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जलाशय, इटियाडोह धरण तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्व प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्यांवर गेला आहे.
गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे वैनगंगेच्या उपनद्यांना दाब निर्माण होऊन अनेक मार्ग बंद पडले आहेत. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गडचिरोलीपासून 7 किलोमीटरवर असलेल्या पाल नदीच्या पुराचे पाणी आल्याने गडचिरोली-आरमोरी तसेच गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद पडला आहे. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथील अनेक शेतांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले आहे. पिंपळगाव व चिखलगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कन्हान नदीसह जिल्ह्यातील पेंच, कोलार, जाम व वर्धा या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला होता. तर खापा शहरासह काही गावांमध्ये कन्हान व पेंच नदीचे पाणी शिरल्याने एसडीआरएफच्या (State Disaster Response Fund) जवानांची मदत घेण्यात आली. नागपूरजवळील कट्टा येथे घर कोसळून बाजीराव उईके (60) यांचा मृत्यू झाला. तर अमरावतीमधील झटामझिरी (ता. वरुड) येथे हा युवक तलावात बुडून मृत्युमुखी पडला.

Related Articles

Back to top button