खासगी रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला प्रतिबंधासाठी भरारी पथके
महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 7 : कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या सर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले
.
कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दरही निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.
काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत असतात. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याबाबत आरोग्य विभागाने सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत. यानुसार अमरावती जिल्ह्यातही या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.
शासनाने निश्चित करून दिलेल्या दर मर्यादेनुसारच रुग्णालयांनी दर आकारणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे कुठेही अवाजवी दर आकारणी होता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.
कोरोना संकटकाळात रूग्णसेवेत कुठेही खंड पडता कामा नये. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे. उपचार सुविधा सर्वत्र उपलब्ध असाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. खासगी रुग्णालयांना जागेची उपलब्धता करून देण्यासाठी हॉटेल उपलब्ध करून घेण्याची परवानगी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कोविड रूग्णालय व इतर रुग्णालयांतील रूग्णवाहिका आदी सुविधांत भर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांनीही या काळात स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर आदी दक्षता नियमांचे पालन करून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे व कोरोनाविरुद्धच्या लढाईत साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भरारी पथकांची जबाबदारी
वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल. खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल. खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमण्याचीही तरतूद आहे. आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी, आदी जबाबदा-या भरारी पथकाकडे सोपविण्यात आल्या आहेत