वॉशिंग्टन/दि २१ – अमेरिकेच्या 46 व्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन यांनी कामाला गती दिली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी सात महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातून त्यांच्या सर्वसमावेशकतेचा प्रत्यय येतो. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात जगातील अनेक देशांत जी कटुता आली, ती दूर करण्यावर बायडेन यांचा भर आहे. ट्रम्प यांनी जगातील अन्य नेत्यांशी बंद केलेली फोनवरची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याच्या काही तासांनंतरच बायडेन हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी तात्काळ 17 आदेशांवर सह्या केल्या. सर्वात पहिली सही त्यांनी मुखपट्टी घालणे बंधनकारक करण्याच्या आदेशावर केली. पहिल्यांदाच अध्यक्ष कार्यालयात पोहोचल्यानंतर बायडेन माध्यमांशी बोलताना म्हणाले, की मला अनेक कामे करायची आहेत, यामुळेच मी येथे आहे. मला वाटते, की माझ्याकडे अजिबात वेळ नाही. वेळ वाया घातला जाऊ शकत नाही. तात्काळ कामे सुरू करत आहे. मी यापूर्वीच सांगितले आहे, की पुढच्या सात दिवसांमध्ये अनेक महत्वाच्या आदेशावर सही करण्यात येईल
बायडेन यांनी मुखपट्टीला फेडरल प्रॉपर्टी घोषित केले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कोरोनाच्या काळात मुखपट्टी लावणे अनिवार्य असणार आहे. सरकारी इमारतीत किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कामे करताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.ट्रम्प यांच्या काळात ही सक्ती नव्हती. ट्रम्प यांनी इराक, इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेनवर लावण्यात आलेली प्रवाशी बंदी उठविण्यात आली आहे. ट्रम्प यांनी 2017 मध्ये ही बंधने आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात लावली होती. आता अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य होईल. बायडेन यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये म्हटले होते, की जर अमेरिकेने जागतिक आरोग्य बळकट केले, तर ते स्वतःही सुरक्षित राहतील. अध्यक्ष होण्याच्या पहिल्याच दिवशी मी अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा आणील. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी अमेरिकेला या संघटनेतून बाहेर काढले होते. अमेरिका आता पॅरिस करारामध्ये पुन्हा सामील होईल. ट्रम्प यांनी 2019 मध्ये या करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. बायडेन यांनी मेक्सिको बॉर्डरच्या फंडिंगवरही बंदी घातली आहे.
अमेरिकेने सध्या कॅनडाबरोबर वादग्रस्त किस्टोन एक्स एल पाइपलाइन करारावर स्थगिती दिली आहे. बायडेन यांच्या निर्णयाबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निराशा व्यक्त केली. 2019 मध्ये ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर 1900 किलोमीटर लांबीची तेल पाइपलाइन तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली होती. बराक ओबामा प्रशासनानेही पर्यावरण गटांचा विरोध लक्षात घेता या पाइपलाइनच्या बांधकामाला बंदी घातली होती. पर्यावरणीय गटांचा असा आरोप आहे, की पाइपलाइनद्वारे कच्चे तेल काढल्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन 17 टक्के जास्त होईल.