मराठी

दिल्लीच्या आंदोलनावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी

नवी दिल्ली/दि. २८ – शेतक-यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून दोन्ही पक्ष एकमेकांना दिल्लीतील हिंसक वळणाला जबाबदार धरीत आहेत.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान दिल्लीतील हिंसाचारावर पोलिसांच्या कारवाईनंतर राजकारणाला सुरुवात झाली आहे. या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि गृह मंत्रालय काय करीत होते? हे मोदी सरकारचे अपयश नाही का? अशा प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने केली. त्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिले. भाजपने म्हटले, की निवडणुकीत जे लोक पराभूत झाले, ते एकत्रितपणे देशाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे केवळ शेतक-यांसोबतच नव्हते, तर त्यांना प्रोत्साहनही देत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) वेळीही असेच घडले होते.
काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले, की शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचला गेला. हिंसाचाराला जबाबदार असणा-या नेत्यांना बाजूला ठेवून इतर शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल केले. यातून मोदी सरकार आणि दंगलखोरांची युती उघड झाली आहे. सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. सरकार लोकांना दम देते. आंदोलन नीट हाताळता न आल्याने लोकांचा रोष निर्माण झाला आणि आता सरकारला गुन्हे दाखल करण्यासाठी जाग आली आहे. सरकार शेतक-यांमध्ये फूट पाडण्याचे व राज्य करण्याचे धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपने दिल्ली पोलिसांची पाठ थोपटली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की मंगळवारी काँग्रेसशी संबंधित संघटनांनी केलेले ट्वीट पहा. अहिंसक मोर्चाला हिंसक करण्याचा तो प्रयत्न होता. लाल किल्ल्यावर जे घडले, ते अहिंसक होते? पोलिस जखमी झाले. बरेचजण अति दक्षता विभागात आहेत. तरीही काँग्रेस या मोर्चाला अहिंसक म्हणत आहे. एका ट्वीटमध्ये असे म्हटले आहे, की युवक काँग्रेस ट्रॅक्टर रॅली मागे ठामपणे उभी आहे. एका अपघातात ट्रॅक्टर चालक शेतक-याचा मृत्यू झाला असताना काँग्रेसने मात्र पोलिसांच्या क्रौर्यामुळे एका शेतक-याचा मृत्यू झाला, असे ट्वीट केले. त्यामुळे हिंसाचार वाढला. जावडेकर म्हणाले, की काँग्रेसची रणनीती अशी आहे, की पोलिसांनी आधी गोळीबार केला आणि मग वातावरण भडकले. कौटुंबिक राजवटीचे काय होईल याची चिंता काँग्रेस व कम्युनिस्टांना आहे. आज काँग्रेस सर्वत्र हिंसा भडकवित आहे. दिल्ली पोलिसांनी मोठा संयम दाखविला. त्यांच्याकडे शस्त्रे होती; परंतु ती त्यांनी वापरली नाहीत.

 

Related Articles

Back to top button