पुणे/दि. ४ – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पूजा चव्हाण प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका भाजप नगरसेवकाचे नावही समोर येत आहे. भाजपचे वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप गायब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी अशी तक्रार बीड पोलिसांकडे दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे, की धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप चोरून त्यातील माहिती चित्रा वाघ यांना दिली आहे. नगरसेवकाने या संपूर्ण प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे आणि माहिती असलेला लॅपटॉप चोरला; मात्र आता हा नगरसेवक गायब झाला असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे आता पूजा चव्हाण प्रकरणातील गूढ आणखीच वाढले आहे. पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली, याच इमारती समोर नगरसेवक धनराज घोगरे यांचे घर आहे. पूजाला दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा लॅपटॉप गायब झाला.
दरम्यान, भाजप नगरसेवकानेच पूजाचा लॅपटॉप गायब केला असल्याचा आरोप आहे. घोगरे या नगरसेवकाने लॅपटॉपमधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना दिली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विरोधातदेखील संगीता चव्हाणांकडून तक्रार देण्यात आली आहे. या लॅपटॉपमधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पुणे पोलिसांनी देखील पूजाचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा आणि आपण त्याचा शोध घेत असल्याची माहिती दिली आहे.