मराठी

भाजपच्या नेत्याचा बागपतमधील मशिदीत हनुमान चालिसा

बागपत/दि.४  – मथुरेतल्या मंदिरात नमाज पठण केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातल्या बागपतमध्ये मशिदीत हनुमान चालिसा म्हटल्याचे उघडकीस आले आहे; मात्र मशिदीचे व्यवस्थापन करणार्‍या संचालकांनी त्या युवकाविरुद्ध कारवाई करण्यास मनाई केली आहे. युवक हा इथल्या गावचा असून ओळखीचा आहे त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये, असे इथल्या मौलांनांनी म्हटले आहे. मशिद हा अल्लाचा दरबार आहे. इथे प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही भाषेत इथे तुम्ही परमेश्वराची भक्ती करू शकता, असे इथल्या मौलानांनी म्हटले आहे. बागपत जवळच्या विनयपूर गावामधल्या मशिदत ही घटना घडली आहे.
मनुपाल बंसल या युवकाने हनुमान चालिसा म्हटली. मनुपाल हे भाजपचे स्थानिक नेते आहेत. याआधी मथुरेतल्या नंदभवन मंदिरात नमाज पठण केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर बागपत मधल्या या युवकाने मशिदीमध्ये हनुमान चालिसा पठण केल्याची घटना घडली आहे. माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली आहे. सामाजिक सद्भावना वाढावी, यासाठीच आपण मशिदीमध्ये हनुमान चालिसा म्हटल्याचे त्याने सांगितले. तो मशिदीमध्ये गेला आणि फेसबुक लाईव्ह सुरू केले. त्यानंतर त्याने फोनवरच हनुमान चालिसा लावली आणि तो म्हणू लागला. यासाठी त्याने मशिदीच्या मौलानांची परवानगी घेतल्याचे सांगितले. मथुरेतल्या नंदगाव इथल्या नंदभवन मंदरात फैसल खान याने नमाज पठण केले होते. त्याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. आपली भूमिका स्पष्ट करताना फैसल याने सांगितले, की आपण सामाजिक सद्भावना यात्रेवर होतो. त्या दिवशी जेव्हा नंदभवन मंदिरात आलो असताना नमाज पठणाची वेळ झाली होती. त्या वेळी मंदिरातल्या लोकांनीच नमाजासाठी जागा दिली. नंतर जेवायलाही घातले. तेव्हा कुणीच आक्षेप नोंदवला नाही. त्यानंतर तीन दिवसांनी त्याला विरोध झाला असे त्याने सांगितले.

Related Articles

Back to top button