मराठी

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात जुंपली

मुंबई/दि.२४ – बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या थकहमीवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आता जुंपली आहे. कोणतीही राजकारण न करता कारखान्याला थकहमी आपणच मिळवून दिल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर पंकजा यांनी त्यांचा हा दावा खोडून काढला आहे.
राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या 34 सहकारी साखर कारखान्यांना 391 कोटी रुपयांची थकहमी दिली आहे. या 34 कारखान्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांबरोबर विरोधातील भाजप नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे.
परळीतल्या वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या थकहमीवरुन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भावाबहिणीत पुन्हा श्रेयाची लढाई दिसून येत आहे. सुडाचे राजकारण न करता शेतकऱ्यांसाठी 11 कोटी रुपयांची थकहमी दिल्याचा दावा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्या कारखान्याला मदत कशी दिली गेली असा प्रश्न येतो. पण जेव्हा मदत दिली गेली तेव्हा आम्ही सूडाचे राजकारण केलेले नाही. भलेही पाच वर्ष आम्हाला या सूडबुद्धीच्या राजकारणाचे बळी व्हावे लागले, तरीसुद्धा आम्ही सत्तेत आल्यानंतर असे राजकारण करणार नाही हे आम्ही ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा दावा पंकजा मुंडे यांनी फेटाळला आहे. वैद्यनाथला मिळालेल्या थकहमीचे श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोला पंकजांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पंकजा म्हणाल्या.
तर दुसरीकडे पंकजा यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनीही त्यांना प्रतिसवाल केला आहे. त्यांनी पाठपुरावा कसा केला, कुठून केला, इथून केला की परदेशात बसून केला हे मला सांगता येणार नाही. पण तिथल्या पाठपुराव्याने ही थकहमी मिळते, की मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून कामकाजात पाहताना सकारात्मक बाजू घेऊन त्या कारखान्याची शिफारस करतो, त्यावेळी थकहमी मिळते एवढे समजायला महाराष्ट्रातील जनता ज्ञानी आहे, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हाणला.

Related Articles

Back to top button