मराठी

भाजप-राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक

पुणे/दि.१९  – पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात चुरशीची लढत होणार असली, तरी भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्वासाठी खरी लढाई होणार आहे. याबरोबरच शहरी मतदार विरुद्ध ग्रामीण मतदार असा एक दृष्टिकोन या निवडणुकीकडे लक्ष वेधून घेतो आणि मुख्यत्वे या मतदारसंघात प्रथमच जातीय समीकरणे मांडली जात आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो; पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनपेक्षितपणे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यामुळे या मतदारसंघात कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उतरवले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे सहकारी असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांचे बंधू संग्राम देशमुख यांना या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी देऊन पक्षात अखेरचा निर्णय हा केवळ फडणवीस यांचा असतो हे सिद्ध केले आहे.
राष्ट्रवादीकडून गेली पाच ते सहा वर्षे उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक असलेल्या लाड यांना अखेर न्याय देत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी निश्चित झाली. लाड यांनी गेल्या निवडणुकीपासूनच या मतदारसंघाशी संबंध जोडला होता. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. जिल्ह्याची ठिकाणे वगळता या मतदारसंघात ग्रामीण भागाचे पूर्णत: वर्चस्व आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि सांगली महापालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे, तर सांगली व सोलापूर अपवाद वगळता पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. पदवीधरसाठी मतदार नोंदणी करताना सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या शहरापेक्षा ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच शहरी भागापेक्षासुध्दा ग्रामीण भागातील मते कोणाला मिळतात यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. प्रामुख्याने पुणे जिल्हा कोणाच्या पाठीशी उभा राहतो, त्याचेच राजकीय भवितव्य घडणार असल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची संख्या तीन लाख 65 हजार 358 वरून 4 लाख 26 हजार 244 पर्यंत पोहोचली आहे. त्यात एकट्या पुणे जिल्ह्यात एक लाख 36 हजार 611 मतदार आहेत. त्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा नंबर लागतो. यावर्षी अधिक झालेल्या 19 हजार मतदारांमध्येही सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यातीलच झाली आहे. त्यामुळे पुणे पदवीधरच्या गत निवडणुकीत मतदार संख्येत क्रमांक तीन वर असलेला पुणे जिल्हा आता पुन्हा अव्वलस्थानी आला आहे. मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार असलेला सांगली जिल्हा तिसर्‍या नंबरवर आहे एकूणच महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. सोलापूर जिल्हा मोठा असूनही या मतदारसंघात पदवीधरांची नोंदणी अत्यंत कमी झाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षाचे थेट उमेदवार नसले, तरी पक्ष पुरस्कृत उमेदवारांना शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी जोरदार टक्कर द्यावी लागत असल्याने बहुरंगी लढतीने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पुणे पदवीधरसाठी यंदा 62 उमेदवार, तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पदवीधरचे 16 तर शिक्षक मतदारसंघाच्या 15 जणांनी माघार घेतली आहे.
शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, काँग्रेस पुरस्कृत उमेदवार जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे (TDF) जी. के. थोरात, शिक्षक संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला असून हे प्रमुख उमेदवार समजले जात आहेत. मागील निवडणुकीत राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार भगवान साळुंखे यांचा शिक्षक कृती समितीचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी पराभव केला होता.

मतदान वाढविण्यावर भर

पदवीधर निवडणुकीच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघात मतदारांची संख्या एक लाखांच्या आसपास असल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. शाळांना अनुदान मिळावे आणि जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू करावी हे दोन प्रमुख मुद्दे घेऊन सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत; मात्र या मुद्द्यांवर विरोधी उमेदवारांनी हरकत घेतली आहे; मात्र संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचा प्रतिवाद सावंत यांच्याकडून प्रचारादरम्यान करण्यात येत आहे.

Back to top button