दिल्लीत केजरीवालांविरोधात भाजपला हवी हजारेंची मदत
नगरः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Eldest social worker Anna Hazare) यांना आता थेट भाजपनेच पत्र पाठवले आहे. दिल्लीतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी भाजपच्या आंदोलनाला मदत करा, अशी हाक दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना दिली आहे. गुप्ता यांनी पत्र पाठवत हजारे यांना आंदोलनात सहभागी होण्याचे साकडे घातले आहे. आदर्श गुप्ता यांनी पत्रात म्हटले, आहे की ‘आम आदमी पक्ष‘ भ्रष्टाचारामध्ये सामील आहे. तुम्ही दिल्लीत या आणि येथील लोकांना हे सांगा. तुमच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता; मात्र आज हाच पक्ष भ्रष्टाचार करताना दिसत आहे. काही जणांनी बनावट कंपनी तयार करून ‘आप‘ला दोन कोटींची देणगी दिल्याचा आरोप करण्यात आला. आता त्यांना अटक केली आहे. याच काळात गुप्ता यांचे हे पत्र हजारे यांना आले आहे. गुप्ता यांनी पत्रात लिहिले आहे, की आम्हाला आठवते की ५ एप्रिल २०११ रोजी तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करून तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण सुरू केले होते. तुमच्या या आंदोलनामध्ये दिल्लीतील आणि देशभरातील कोट्यावधी लोक सामील झाले होते; मात्र या आंदोलनानंतर तुमच्याच नावाने काही लोकांनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेच्या नावाखाली निवडणुकीत उतरले. अरqवद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापन केली आहे. ते मुख्यमंत्रीही आहेत. गुप्ता यांनी हजारे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेकांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांनी या पत्रामध्ये लिहिले आहे, की दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले. यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले आहेत. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर; या नावांची यादी लांबलचक आहे. खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना ‘आप‘ने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागत आहे. आता अण्णा तुम्ही पुन्हा दिल्लीमध्ये यावे आणि भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवावा आणि भाजपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.