रामभक्तांवर कारवाईचा भाजपा ने दर्शविला निषेध
-
भूमिपूजनाचा सोहळयानंतर आनंदोत्सव साजरा करणार्या कार्यकर्त्यांवर कारवाई
-
उपाध्याय म्हणाले शिवसेनेचे खरे रूप समोर आले
मुंबई – राममंदिराच्या भूमिपूजनानिमित्त शांततेत आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने कारवाई करून मोगलाईचे दर्शन घडवले ,अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुंबईत केली. ते म्हणाले कि अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. देशात तसेच राज्यात रामभक्तांनी जल्लोष केला. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यानंतर आनंदोत्सव साजरा कऱणाऱ्या काही उत्साही कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली होती.
उपाध्ये म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात सर्व नियम, बंधने पाळूनच हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षातर्फे राज्यभरातील कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. असे असताना पोलीस यंत्रणेने काही ठिकाणी दबाव तंत्राचा वापर होऊन आनंदोत्सव होणारच नाही यासाठी प्रयत्न केले. पिंपरी- चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांनी 10 लाख लाडूचे वाटप करण्याचे ठरविले होते. मात्र पोलिसांनी लाडू वाटप करण्यास प्रतिबंध केला. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमा आणि झेंडे जप्त केले. इंदापूर, बारामती, सासवड येथे कार्यक्रम होऊच दिले नाहीत.विदर्भात अमरावती, बडनेरा, परतवाडा, पुसद, अकोला येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले. परळी येथे आनंदोत्सव साजरा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. सिन्नर येथे आरती केल्याबद्दल शहर अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना 3 तास पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले गेले. अनेक ठिकाणी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली गेली. नगर जिल्ह्यात पोलिसांनी कहर करून कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, शेवगाव या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.