मराठी

भाजपच्या आयटीसेलवर भडकले खा. स्वामी

नवीदिल्लीः वेगवेगळ्या मुद्यांवर भूमिका मांडणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आपल्याच पक्षाच्या आयटी सेलवर भडकले आहेत. स्वामी यांनी ट्वीट करून आपला संताप व्यक्त केला. भाजपची आयटी सेल बनावट खाती तयार करून आपल्यावर हल्ले करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात पक्षाकडे एक मागणीही केली आहे.

स्वामी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, की भाजपच्या आयटी सेल कामातून गेली आहे. ती बेकार झाली आहे. काही सदस्य बनावट आयडीचा वापर करून माझ्यावर हल्ले करत आहेत. मग माझ्या संतप्त समर्थकांनी उत्तर देण्यास सुरुवात केली, तर मी त्याला जबाबदार असणार नाही. ज्याप्रमाणे माझ्यावर होत असलेल्या हल्ल्यांना भाजपला जबाबदार ठरवता येणार नाही. स्वामी यांच्या ट्वीटवर एका समर्थकाने ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. “आपण टीकेपेक्षा वरचढ आहात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपण त्यांना महत्त्व देत असाल, तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात,” असे म्हटले आहे.
त्यावर बोलताना स्वामी म्हणाले, की मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो; पण भाजपने त्यांची हकालपट्टी करावी. एक मालवीय नावाचे पात्र आहे, घाणेरडा दंगा करत आहे. आपला पक्ष मर्यादा पुरूषोत्तम रामाचा पक्ष आहे, रावण किंवा दुःशासनाचा नाही,” अशा शब्दांत आयटी सेलच्या प्रमुखांना फटकारले आहे.

खा. स्वामी हे भाजपचे असे खासदार आहेत, जे पक्षाच्या विरोधातही भूमिका मांडतांना दिसतात; मात्र या वेळी स्वामी यांनी पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधातच बंड पुकारले आहे. विशेष म्हणजे त्यांनी मालवीय यांची हकालपट्टी करण्याची मागणीही पक्षाकडे केली आहे.

Related Articles

Back to top button