मराठी

मतदानाच्या दिवशी भाजपचे संदेश

आचारसंहितेचा भंग

पाटणा/दि.३  – मतदानाच्या सकाळी दहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे पाहून भाजपने मोठ्या प्रमाणात मोबाईल मेसेज पाठवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना निवडणूक आयोगाने मात्र बघ्याची भूमिका घेतली.
सकाळी मतदानाचे प्रमाण कमी असल्याचे पाहून भारतीय जनता पक्षाने एक संदेश पाठविला. त्यात मतदान करण्याचे आवाहन केले होते; परंतु त्यातून आचारसंहितेचे उल्लंघन होत नव्हते. त्यानंतर आणखी एक संदेश पाठविला; परंतु दोन तासांनंतर भाजपकडून पाठविलेल्या संदेशात आपल्या क्षेत्रातील मतांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भाजपला जिंकण्यासाठी मत द्या. या संदेशामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होते. प्रचाराची मुदत संपल्यानंतर अशा प्रकारचा प्रचार करणे आचारसंहितेत बसत नाही. मतांची टक्केवारी कमी झाली, तर पराभव होईल, या आशंकेने भाजप पछाडला होता. यापूर्वी कमी मतदानाचा फटका भाजपलाच बसला होता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाचा ट्रेंड सकाळपासूनच खराब असल्याचे दिसून आले. त्यानंतर मतदान कमी झाल्याची माहिती देत भाजपच्या आयटी सेलने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. एडी-भाजपाबीआयएचच्या नावाचा पहिला संदेश सकाळी 10:14 वाजता आला.  त्यात लवकर मतदान करावे आणि आपल्या कुटुंबालाही मतदान करण्यास प्रवृत्त करावे, अशी विनंती करण्यात आली होती.
सकाळी दहा वाजताच्या संदेशानंतर मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नाही, म्हणूनच या संदेशाद्वारे दुसरा संदेश दुपारी 12:11 वाजता पाठविण्यात आला. त्यामध्ये असे लिहिले आहे, की तुमच्या मतदान केंद्रांमध्ये कमी मतदान झाले आहे. कृपया अधिकाधिक मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करा. भाजपला विजयी बनविण्यासाठी आपल्या बूथवर जास्तीत जास्त मते मिळायला हवीत. पक्षाचे प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांच्यानुसार हा संदेश मॅन-टू-मॅन संपर्कात पाठविला गेला आहे आणि यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. पाटण्याच्या निवडणूक अधिका-यांना संपर्कासाठी फोन केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही. निवडणूक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मतदान क्षेत्रात प्रचार संपल्यानंतर कोणताही उमेदवार किंवा पक्ष पक्षाच्या बाजूने व्यापक प्रचार करू शकत नाही.

Related Articles

Back to top button