मराठी

रिपाई देणार बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला संरक्षण

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले ने दिली माहिती

मुंबई/दि.४– मुंबईत 9 सप्टेंबरला येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं (Kangana Ranaut) पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू केलं आहे. कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यात कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी तिला मुंबई व महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पण, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी आरपीआय तिला संरक्षण देणार असल्याचे जाहीर करताना सत्ताधारी शिवसेनेलाही सुनावलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे? असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणौतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकार वर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगनाला धमकी देणे योग्य नाही. कंगना यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगनला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशारा रामदास आठवले यांनी आज दिला आहे.

Related Articles

Back to top button