मराठी

बॉलीवूडचे ड्रग्न कनेक्शन जुनेच !

नामांकित सेलिब्रिटींना ड्रग्सच व्यसन

नवी दिल्ली/दि. ९ – अभिनेता सुशांतसिंह राजपूत(SUSHANT SINGH RAJPUT) आत्महत्या प्रकरणानंतर आता अभिनेते, अभिनेत्री अंमली पदार्थाच्या कशा आहारी जात आहेत, याची चर्चा होत असली आणि रिया चक्रवर्तीने(RHEA CHAKRABORTY) बॉलीवूडमधील एेंशी टक्के लोक अंमली पदार्थ घेत असल्याचा आरोप केला असला, तरी बॉलीवूडमध्ये ड्रग्सचा(DRUGS) ट्रेंड नवीन नाही किंवा अमली पदार्थ आणि बॉलीवूड याचा संबंध प्रथमच समोर आलेला नाही. बॉलीवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी अनेक वेळा ड्रग्सच्या व्यसनाचा दुजोरा दिला आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे अनेकांची कारकीर्द कायमची संपली आहे. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर संजय दत्त आधीच ड्रग्जचा बळी ठरला होता. १९८१ मध्ये जेव्हा त्याची आई नर्गिस कर्करोगाने मरण पावली, त्यानंतर तो अमली पदार्थांच्या जास्तच आहारी गेला. १९८२ मध्ये ड्रग्स बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला तुरूंगातही टाकण्यात आले. बॉलीवूडमध्ये आल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या करिअरचा आलेख चढू लागला, तेव्हा तो पुन्हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याला या सवयीपासून मुक्त करण्यासाठी त्याचे वडील सुनील दत्त यांनी अमेरिकेच्या रिहॅब सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार केले. तीन वर्षांनंतर १९८५ मध्ये संजयने पुन्हा ‘जान की बाजी‘ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमधील ‘यूथ आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणा-या रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान तो शालेय जीवनात ड्रग्सचा बळी होता, याचा गौप्यस्फोट केला होता.
त्याच्या सांगण्यानुसार, रॉकस्टार चित्रपटासाठी स्वत: ला तयार करण्यासाठी त्याने गांजा वापरला होता. त्यामुळे त्याला गांजाची सवय लागली होती. फिरोज खानचा मुलगा फरदीन खान याला घरी कोकेन बाळगल्याच्या आरोपाखाली नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केली होती; मात्र २०१२ मध्ये त्याला पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सोडले. असे म्हटले जाते, की त्याला एका वाईट मादक पदार्थांचे व्यसन होते. योयो हनी सिंग(YO YO HONEY SINGH) काही काळापूर्वी संगीत आणि बॉलीवूड इंडस्ट्रीवर वर्चस्व गाजवत होते; पण मादक पदार्थांच्या व्यसनाने त्याचे करिअर खराब केले. संगीत उद्योगात नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर तोही ड्रग्जच्या आहारी गेला. एक वर्षासाठी त्याच्यावर पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले. ९० च्या दशकाची मॉडेल गीतांजली सुश्मिता सेन सारख्या आयकॉनिक मॉडेलसह रॅम्पवर कॅटवॉक फिरताना दिसली; पण मादक पदार्थांच्या सवयीमुळे तिचे करिअर आणि आयुष्य बरबाद झाले. तिची आर्थिक आणि मानसिक स्थिती इतकी बिकट होती, की शेवटच्या दिवसांत ती दिल्लीच्या रस्त्यावर भीक मागताना दिसली. बॉलिवूड अभिनेता विजय राजलाही ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली. २००४- २००५ मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा विक्की गोस्वामी यांचे दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाव होते. ममता या प्रकरणातील आरोप निराधार असल्याचे सांगत आहे.

अनेकांचे आयुष्य बरबाद

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रितिक याने व्यसनाधीन असल्याचे कबूल केले. तो पाच वर्षे अटकेत होता. एकामागून एक अपयशी चित्रपट आणि अभिनेत्री अ‍ॅजमी जॅक्सनबरोबरच्या प्रेमातील अपयशाने त्याला मादक पदार्थांच्या व्यसनाधीनतेकडे ढकलले. एकेकाळी बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असणारी मनीषा कोईरालाही ड्रग्जमुळे संपली. काही काळापूर्वीच तिच्यावर कर्करोगाचे उपचार झाले.

Related Articles

Back to top button