आॅनलाईन विक्रीमुळे अर्थव्यवस्थेला बुस्टर
मुंबई/दि.१३ –सणासुदीच्या काळात नवीन वाहन नोंदणी आणि क्रेडिट कार्ड व्यवहारात वाढ झाली आहे. स्मार्टफोनची विक्री फारच वाढली आहे. ऑनलाईन किरकोळ विक्री व अन्य व्यवसायातील उलाढालीवरून असे दिसून येते, की आशियातील तिस-या क्रमांकाची भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे. सणांच्या हंगामात ऑनलाइन किरकोळ विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात अमेझॉन डॉट कॉम आणि फ्लिपकार्टच्या ऑनलाईन विक्रीत मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली. रेडसीरच्या अहवालानुसार १ ६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान अमेझॉन आणि फ्लिपकार्टने 1.१ अब्ज डॉलर्सची उत्पादने विकली. सणासुदीच्या काळात वाहनांची विक्रीही वाढली. यामुळे नवीन वाहन नोंदणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफएडीए) च्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये १४ लाख दहा हजार नवीन वाहनांची नोंद झाली आहे. एफएडीएच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टरपासून प्रवासी वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची मागणी आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात सुधारणा कर संकलन, उत्पादन आणि सेवा उपक्रमांतही सातत्याने सुधारणा होत आहेत.
उपभोग निर्देशांकात स्थिर सुधारणा होत आहे. आता त्यात साठ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 2३.९ टक्के घट नोंदली गेली. वार्षिक आधारावर ही सर्वांत मोठी घसरण होती. सप्टेंबरमध्ये औद्योगिक विकास दर फक्त 0.2% होता. क्रेडिट कार्ड व्यवहारातही सुधारणा होत आहे. ऑगस्टमध्ये क्रेडिट कार्ड व्यवहारात 8 टक्के वाढ झाली. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये 142.89 दशलक्ष क्रेडिट कार्ड व्यवहार नोंदले गेले. या व्यतिरिक्त स्मार्टफोन भारतात सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन म्हणून उदयास आले आहे. आंतरराष्ट्रीय डेटा कॉर्पच्या म्हणण्यानुसार, २०२० च्या तिस-या तिमाहीत स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत भारत अव्वल-3 मध्ये कायम आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी 6.98 टक्के होती. तथापि, बरेच छोटे आणि मध्यम आकाराचे व्यवसाय बंद पडल्यामुळे मोठ्या संख्येने लोक रोजगारासाठी झगडत आहेत.