वरुड/दि.१० – शहरातील अप्रोच रोड परिसरामध्ये एका २६ वर्षीय युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असुन पुढील तपास सुरु आहे. सविस्तर माहितीनुसार, शहरातील अप्रोच रोडवरील सरोज मोहता यांचे निवासस्थानी भाड्याने राहत असलेल्या राहुल ज्ञानेश्वर गोरडे (२६) रा.लोणी या युवकाने काल (ता.९) सायंकाळच्या सुमारास राहते घरीच दुपट्टयाने गळफास घेवुन आत्महत्या केली.
राहुल याने काही दिवसांपुर्वीच शहरातील यावलकर सभागृहालगत काही दिवसांपुर्वीच ब्रम्हांडनायक नामक हॉटेलचा व्यवसाय एका मित्रासोबत भागीदारीमध्ये सुरु केला होता. गेल्या आठवड्यातच नातेवाईक व आप्तेष्टांच्या उपस्थितीत पुजा अर्चा करुन व्यवसायास प्रारंभ केला होता. काही दिवसातच त्याच्या व्यवसायाला सुगीचे दिवस येत असतांना अचानक राहुल याने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. राहुल हा मुळचा तालुक्यातील लोणी येथील रहिवाशी असुन त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
राहुलने आत्महत्या केल्याचे कळताच अनेकांनी त्याचे निवासस्थानी जावुन अंत्यदर्शन घेतले. राहुलने आत्महत्या का केली? याबाबत वृत्तलिहीस्तोवर माहिती मिळु शकली नाही. याप्रकरणी माहिती मिळताच जमादार गजानन गिरी व हे.कॉ.सागर लेवरकर यांनी घटनास्थळ गाठुन मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात रवाना केला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.