मराठी

30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का?

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

मुंबई/दि.२९ -विद्यापीठाच्या परीक्षांबाबत सोमवारी 12 वाजेपर्यंत पहिला निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेऊ शकतो का याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्याच्या उद्या ही समिती कुलगुरु आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे. यानंतर माजी कुलगुरुंसोबतही संवाद साधला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अतिशय सोप्या पद्धतीनं या परीक्षा घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलंय. विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमधला संभ्रम वाढेल असं कुणीही राजकारण करु नये असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. ही तारीख राज्य सरकार पुढं ढकलू शकते, असं कोर्टानं म्हटलं आहे.
30 सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढं ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असं कोर्टानं म्हटलंय. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असंही कोर्टानं म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button