मराठी

सेवायोजन कार्यालयाला नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आधारक्रमांक लिंक करावे

31 ऑगस्ट अंतीम मुदत ; (www.rojgar.mahaswayam.gov.in) संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 25 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता (District Skill Development Employment and Entrepreneurship) मार्गदर्शन केंद्रामध्ये (सेवायोजन कार्यालय) नाव नोंदणी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवारांनी तसेच बेरोजगार युवकांनी दि. 31 ऑगस्टपर्यंत आपल्या नोंदणीला आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन सेवायोजन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

आधारकार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी विभागाव्दारे www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळ जारी करण्यात आले असून दि. 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया ऑनलाईन लाईन पध्दतीने करणे अनिवार्य आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांच्या नोंदणीला आधारकार्ड क्रमांक लिंक करणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवासुविधा ह्या आता उपरोक्त वेबसाईटच्या (www.rojgar.mahaswayam.gov.in) माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांना पुढीलप्रमाणे सेवा पुरविण्यात येतात.

यामध्ये राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यासंबंधी माहिती देणे, त्यासाठी उमेदवारांची उत्सुकता व पसंती क्रमांक नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती देणे व त्यामध्ये सहभाग घेणे, उमेदवारांच्या नोंदणीत शैक्षणिक पात्रतेत वाढ करणे, पत्ता,  संपर्क क्रमांक,  ईमेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांना वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदाची माहिती युवकांना उपलब्ध करुन देणे व  त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे इत्यादी बाबी संदर्भात माहिती दिली जाते.

उद्योजकांच्या वेळोवेळी गरजेनुसार व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यामध्ये समावेश होण्यासाठी उमेदवारांच्या नोंदणीत आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी आपल्या नोंदणीत आधार कार्ड क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे.

अन्यथा उमेदवार या प्रकारच्या संधीपासून वंचित राहू शकतो, यासाठी सेवायोजन कार्यालयाकडे नोकरीसाठी नाव नोंदणी केलेल्या प्रत्येक उमेदवाराने तत्काळ www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून आपल्या नोंदणीत आपले आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने जोडावे आणि या सर्व सेवा सुविधांसाठी स्वतः समक्ष बनवून विभागाव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच अशाप्रकारे आधार नोंदणी केल्यानंतर किंवा त्याबाबत काही अडचण असल्यास सेवायोजन कार्यालयाच्या 0721-2566066 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com, asstdiremp.amravati@ese.maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास आरोग्य व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे

Back to top button