मराठी

बायडेन यांच्या सत्तांतरामुळे भांडवली बाजार तेजीत

मुंबई/दि २१ – मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी प्रथमच 50 हजारांची विक्रमी पातळी ओलांडली. अमेरिकेत जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक शेअर बाजारावरही दिसत आहे. बजाज फायनान्स, बजाज फाइनसर्व्ह, रिलायन्ससह टेक महिंद्रासारखे बाजारातील मोठ्या शेअर्समध्ये 3.68 टक्के वाढ झाली आहे. याआधी 23 मे 2019 रोजी सेन्सेक्सने 40 हजारांचा आकडा गाठला होता.
सेन्सेक्स सकाळी 9:56 वाजता 259 अंकांनी वधारून 50 हजार 51.22 वर व्यापार करत होता. मुंबई शेअर बाजारावर 2,390 कंपन्यांच्या शेअर्सचा व्यापार होत आहे. 1,470 शेअर नफ्यावर आणि 798 घसरणीसह व्यापार करत आहेत. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅपही पहिल्यांदा 198.75 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक 68.20 अंकांनी वाढून 14 हजार 712.90 वर व्यापार करीत आहे. यामध्ये टाटा मोटर्सचा शेअर 3.31 टक्क्यांवर व्यापार करत होता. वाहन क्षेत्रातील तेजीमुळे निफ्टी ऑटो इंडेक्सही एक टक्क्यावर व्यापार करीत आहे. सेन्सेक्स एका वर्षाच्या सर्वात नीचांकी स्तरापेक्षा दुप्पट पातळीवर व्यापार करीत आहे. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी तो घसरून 25 हजार 638 पर्यंत घसरला होता.
इंडेक्स जून 2014 मध्ये प्रथमच 25 हजार पातळीवर गेला होता. म्हणजेच पाच वर्षांत तो दुप्पट झाला आहे. सेन्सेक्स दोन जानेवारी 1986 रोजी सुरू करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे 1978-79 मध्ये इंडेक्सची बेस व्हॅल्यू 100 अंक होती.

 

Related Articles

Back to top button