गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करां
बृहन्मुंबई महानगरपालिका व शासनस्तरावरुन नागरिकांना आह्वान
मुंबई/दि.२१- कोविड-19 साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका व शासनस्तरावरुन वेळोवेळी नागरिकांना करण्यात आले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी गणेशोत्सव – 2020 साजरा करताना विसर्जनादरम्यान पालन करावयाच्या आवश्यक सूचना दिल्या आहेत. घरगुती गणेशोत्सव साजरा करणा-या भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे. मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जावून मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.नैसर्गिक विसर्जन स्थळांवर महापालिकेद्वारे अतिरिक्त मनुष्यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे. 2020 गणेशोत्सवा दरम्?यान कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्यावी. विसर्जना दरम्यान सामाजिक दूरीकरण अंतर , मास्क/मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्यादी आरोग्य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.