पुणे/दि.२४– पुणेकरांचा स्वभाव, त्यांच्या पाट्या, चितळेंची बाकरवडी ते त्यांच्या सवयी अगद जगात प्रसिद्ध आहेत. यावरुन अनेक विनोदही केले जातात. मात्र पुण्यातील एका आमदारांनी पुणेकरांनाच चक्क उपदेशाचे ढोस पाजले आहेत. कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान थेट पुणेकरांनाच टोला लगावला. सध्या चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
पिपंरी-चिंचवडमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमादरम्यान आमदार चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पुण्यात काही जणांना दुपारी 1 ते 4 झोपण्याची सवय असते. याकाळात काही काम करण्यास नकार दिला जातो. मात्र मोदींकडे पाहा..ते दिवसातील 22 तास काम करतात, असे म्हणत त्यांनी पुणेकरांना जोरदार टोला लगावला. कामं करण्यासाठी निवडून यायचं असतं, अन्यथा पाच आणि सहा वेळेस आमदार झाले तरी काही उपयोग होत नाही. आपल्या आयुष्यातील ध्येय आधी ठरवायची असतात व त्यासाठी कष्ट करायचे असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हे शिकलं पाहिजे. त्यांच्यावर कोणी कितीही टीका केली तरी ते सरळमार्गाने चालत राहतात. अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळीही अनेकांनी टीका केली. मात्र मोदी अयोध्येत जाऊन भूमिपूजन करून आले. प्रत्येकाला रात्री झोपताना आपण चुकीचं काही केलं नाही, याचं समाधान असणं खूप गरजेचं आहे. मोदींच्या झोपेविषयी बोलताना पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांना काही तासांची झोपही पुरेशी आहे. त्यामुळे ते दिवसातील 22 तास काम करतात. मात्र पुण्यात काही जणांना 1 ते 4 पर्यंत झोपायची सवय असते.