मराठी

पेटीएम, गुगल पेच्या पेमेंट सिस्टीममध्ये बदल

नवी दिल्ली/दि.२३ – सध्याच्या काळात चहावाल्यापासून ते दूध आणि भाजी विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकजण डिजिटल पेमेंटचा आधार घेत आहेत. प्रत्येकाकडे पेटीएम, गुगल पे सारखे अनेक पेमेंटचे पर्याय आहेत. ज्यासाठी आपल्याला फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक असते आणि आपले पेमेंट दिले जाते. रिझव्र्ह बँकेने एक आदेश जारी करून या पेमेंट सिस्टीममध्ये बदल करण्यास सांगितले आहे. रिझव्र्ह बँकेच्या आदेशानुसार देशात डिजिटल आणि सिक्यूअर व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना क्यूआर कोड सिस्टममध्ये शिफ्ट करावे लागेल, जे इतर पेमेंट ऑपरेटरद्वारे स्कॅन केले जाऊ शकते. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित करण्यात आली आहे. पेमेंट कंपन्यांना इंटरऑपरेबल क्यूआर कोड वापरणे आवश्यक करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने एक मसुदा तयार केला आहे. इंटरऑपरेबल क्यूआर कोड म्हणजे कोणताही अ‍ॅप असला, तरी हा क्यूआर स्टिकर सहजपणे वाचू शकतो. सध्या देशात तीन प्रकारचे क्यूआर कोड भारत क्यूआर, भारत युपीआय क्यूआर आणि प्रोपाईटरी क्यूआर कोड आहेत. युपीआय क्यूआर आणि भारत क्यूआर पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. इंटरऑपरेबल क्यूआर कोडबद्दल जनजागृती करण्यासाठी पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्सना पावले उचलावी लागतील. या इंटरऑपरेबिलिटीमुळे सामान्य लोकांना पेमेंट करणे सोपे होईल. पेमेंट सिस्टीमदेखील पूर्वीपेक्षा अधीकच चांगली होईल. रिझव्र्ह बँकेने यासाठी एक नियामक चौकटही तयार केलेली आहे, जेणेकरुन देशात विविध प्रकारच्या पेमेंट सिस्टीम ऑपरेट करता येतील.

Related Articles

Back to top button