मेहकर दि १३- पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुणे येथील सिंहगडरोडवरील एकाची तीन लाख रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मेहकर तालुक्यातील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी रोख तीन लाख रुपयांसह दोन चारचाकी वाहने मिळून नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी लोणार न्यायालयाने सुनावली आहे. शनिवारी पोलिसांनी ही कारवाई करावी.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख चांद शेख अफजल (38), प्रदीप परशराम डोंगरे (33, दोघे. रा. जानेफळ), दीपक हरिभाऊ राठोड (32, रा. पारडी), रहीम खा मजीद खा पठाण (32, रा.उटी), संतोष सुखदेव जाधव (25, रा. घुटी) यांचा समावेश आहे. यातील शेख चांद शेख अफजल याच्यावर यापूर्वी फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, अकोल्यातील समाजवादी पक्षाचे नेते मुकीम अहमद व साखरखेर्डा येथील शेख शफी कादरी यांच्या दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी आहे. पोलिसांनी रोख तीन तीन लाख रुपये आणि एमएच-04-जीजे-8339 आणि एमेच-12-एफपी-3367 क्रमांकाची दोन वाहने जप्त केली आहेत.
पुण्यातील सिंहगडरोडवर राहणाऱ्या शहाजी वसंत (46) यांची शेगाव येथे दर्शनासाठी आले असता शेख चांद याच्यासोबत अमडापूर येथे ओळख झाली होती. त्यातून शेख चांदने त्यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले होते. शहाजी वसंत हे शुक्रवारी नातेवाईकासह तीन लाख रुपये घेऊन सुलतानपूर येथे आले. तेथे शेख चांदने त्यांना एका शेतात नेत त्यांच्याकडील रोख रक्कम घेवून पलायन केले. ज्या वाहनाने त्याने पलायन केले त्या वाहनासह अन्य एक वाहन समृद्धी महामार्गाच्या जवळ सापडले. प्रकरणी शहाजी वसंत यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रात्रीच गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेत उपरोक्त पाचही जणांना अटक केली.