मुख्यमंत्री सिंग, नवज्योत सिद्धूत दुरावा कायम
चंदीगड/दि. २६ – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांची नात सहिंदर कौर यांच्या लग्नाच्या आनंदात राज्यातील सर्वमंत्री, आमदार आणि खासदारांना स्नेहभोजन दिले. सिजवानमधील मुख्यमंत्री फार्महाऊस येथे झालेल्या या स्नेहभोजनाकडे नवजोत सिंग सिद्धू यांनी फिरवलेली पाठ हा पंजाबच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधी गोटातील प्रतापसिंह बाजवा यांच्या उपस्थितीने सर्वांनाच चकित केले.
मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनात आमदार व मंत्री मोठ्या संख्येने सामील झाले. काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रतापसिंह बाजवा यांच्या उपस्थितीने सर्वांना चकित केले. कॅ. सिंग आणि बाजवा यांच्यामधून विस्तव जात नाही. हे दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असूनही बाजवा मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी दाखल झाले. पंजाब विधानसभेच्या निवडणुका पुढच्याच वर्षी असल्यानेबाजवा यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. बाजवा यांचे बंधू फतेह जंग हेकादियानचेआमदार आहे.
सिद्धू यांची अनुपस्थिती आमदारांमधील चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसचेप्रदेश प्रभारी हरीश रावत यांच्या मध्यस्थीनंतर सिंग आणि सिद्धू यांच्यातील संबंध सुधारल्याचे सांगितले जात होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सिद्धूयांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु सिद्धूयांनी मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाकडे पाठ फिरवल्यामुळे भविष्यात काही नवीन राजकीय समीकरणेही निर्माण होऊ शकतात. सुखबिंदरसिंग सरकारिया आणि रझिया सुलताना या दोन मंत्र्यांनीदेखील स्नेहभोजनाकडेपाठ फिरविली.