नवी दिल्ली/दि.२५- चिनी कार निर्माती कंपनी असलेल्या एमजी मोटार्सला (MG MOTORS) भारतात चिनी वस्तूंवर बहिष्काराचा मोठा फटका बसत आहे. कंपनीनं आता पुन्हा एकदा भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. टीओआयच्या अहवालानुसार, एमजी मोटर्स आपली नवीन मॉडेल्स लाँच करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.
एफडीआय नियमात बदल झाल्यामुळे आता कंपनीला गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमोशन डिपार्टमेंट कडून मान्यता घ्यावी लागेल.
चिनी वस्तूंवर बहिष्कार हे अल्प काळासाठी असेल, असं एमजी मोटर्स इंडियाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजीव छाब्रा म्हणाले की, देशासाठी काय योग्य आहे आणि काय नाही याचा निर्णय घेण्याचा भारत सरकारला सर्व हक्क आहे.
प्रत्येक सरकारने देशाच्या भल्याचा विचार केला पाहिजे. जेव्हा त्यांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या भावनेबद्दल विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की, हे सर्व अल्पकालीन आहे, परंतु जर मध्यम ते दीर्घ मुदतीपर्यंत पाहिले तर कंपनी वाढेल. त्यांनी सांगितले की, अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात देशांमध्ये तणाव आहे, परंतु यामुळे व्यवसायावर परिणाम होत नाही.
कंपनीने भारतात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली
एमजी मोटर्सने यापूर्वीच भारतात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी जनरल मोटर्सचा प्लांटही विकत घेतला आहे. सध्या ही कंपनी भारतात हेक्टर प्रीमियम एसयूव्हीची विक्री करीत आहे. छाब्रा यांनी कंपनीच्या नवीन मॉडेल ग्लॉस्टर विषयीही चर्चा केली, जे लक्झरी एसयूव्ही आहे. ते म्हणाले की, भारतातील एमजी मोटर्स आता लोकलायझेशन वाढवेल. ते असेही म्हणाले की, चीनपेक्षा भारतामध्ये पार्ट्स अधिक महाग आहेत, परंतु तरीही ही कंपनी लोकलायझेशनवर जोर देईल.