मराठी

चिरागचे बंड झाले थंड

राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहण्याचा निर्णय

पाटणा/दि. १२ –  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे बिहारमध्ये आगमन होताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एकी दिसायला लागली आहे. नड्डा यांनी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. दुसरीकडे, लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी एनडीएबरोबर राहण्याचे स्पष्ट केले आहे. भाजप जो काही निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आतापर्यंत मी लोकप्रतिनिधी म्हणून बिहारच्या लोकांच्या समस्या व प्रश्न उपस्थित करीत होतो. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पासवान म्हणाले, की मला हे स्पष्ट करून सांगायचे आहे, की आम्ही कोणत्याही भाजप नेत्याला भेटलो नाही. जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून बिहारच्या जनतेच्या समस्या उपस्थित करीत होतो. मी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशीच बिहारच्या लोकांबद्दल बोलणार आहे. बिहारमधील जनतेची समस्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली जात असेल तर त्यात गैर काय? माझ्या लोकांसाठीच्या काळजीचे वेगळे अर्थ लावले गेले आहेत. माझा मुख्यमंत्री नितीशकुमारांशी कोणताही वाद नाही. त्यांना विरोध नाही.
चिराग हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात सातत्याने टीका करीत होते.  रेशनकार्डपासून कोरोनाच्या व्यवस्थेपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. संयुक्त जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्यानेही लोक जनशक्ती पक्षाशी आमची युती कधीच नव्हती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून स्वतंत्र होण्यास लोक जनशक्ती पक्ष  स्वतंत्र आहे. जीतनराम मांझी यांनी चिराग यांच्यावर सातत्याने टीका केली.

अस्तित्वासाठी बंडाचे निशाण म्यान

केंद्रीय अन्नमंत्री आणि लोकजन शक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, त्यांनी चिराग पासवान यांच्या निर्णयामागे ठामपणे उभे असल्याचे ट्विट केले. त्यांच्या ट्विटचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच चिराग यांनी आपले बंडाचे अस्त्र म्यान केले आहे. चिराग यांच्या बंडाने भाजप आघाडीपेक्षाही लोक जनशक्ती पक्षाचेच जास्त नुकसान झाले असते.

Back to top button