लसीकरण करून घेण्यास नागरिक अनुत्सुक
माॅस्को/दि.९ – ब्रिटनमध्ये मंगळवारपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. अमेरिकेतही याच महिन्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. लसीकरणात आपण कुठेही जगातील स्पर्धक देशाच्या तुलनेत मागे राहू नये, म्हणून रशियाने पाच डिसेंबरलाच स्पुटनिक-५ चे लसीकरण सुरू केले. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांना डोस दिला जात आहे; परंतु बहुतांश लोक हे लसीकरण करून घेण्यास तयार नसल्याचे नाहीत. लस किती सुरक्षित आहे, यावरून जगभरात संशय आहे. त्यामुळे रशियातील मोठ्या वर्गाने लसीकरणासाठी नकार दर्शवला आहे.
रशियात सध्या लसीचे परीक्षण सुरू आहे. भारतातही या लसीचे परीक्षण सुरू आहे; परंतु रशियाचे सरकार अब्जावधी डॉलरच्या कोरोना लसीच्या शर्यतीत स्वत:ला आघाडीवर ठेवण्यासाठी घाईगडबडीत लसीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप होत आहे. ऑगस्टमध्ये काही डझन लोकांवर चाचण्या झाल्या. त्यानंतर आता स्पुटतनिक-५ ला आपत्कालीन वापरासाठी नोंदणीकृत केल्याचे घोषित केले होते. एवढेच नव्हे तर काही दिवसांपासून त्याचा वापरही सुरू आहे. अशा प्रकारे रशियाची लस आल्याचा दावा मान्य केला जाऊ शकत नाही. राष्ट्रपती व्लादीमिर पुतीन यांच्या मुलीसह अनेक लोकांनी या लसीचे डोस घेतले आहेत. लोकांचे शंकासमाधान न करता लसीकरण करण्याचे आता रशियन प्रशासनासमोर आव्हान आहे.
सोव्हिएत संघ व अमेरिका यांच्यातील शीतयुद्धामधील कारणामुळे तणाव वाढलेला असताना रशियाने स्पुटनिक उपग्रहाचे प्रक्षेपण करून जगाला चकित केले होते. हा अंतराळात जाणारा पहिला उपग्रह होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असल्याचा संदेश तेव्हा रशियाने अमेरिकेला दिला होता. पश्चिमेच्या तुलनेत आपली क्षमता उत्कृष्ट असल्याचे व लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी लसीचे नामकरणही स्पुटनिक असे केले. वास्तविक लसीचे परीक्षण पूर्ण केले नसल्याने स्पुटनिकची विश्वासार्हता निर्माण होऊ शकलेली नाही.