अमरावती दी ९ – कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही मुखत्वे श्वसनसंस्थेशी निगडित असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे,न्यूमोनिया अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. कोरोना विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेव्दारे, त्याचप्रमाणे, शिंकणे, खोकणे, हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. या आजाराच्या अनुषंगाने 50 वर्षांवरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, किडनीचे व गंभीर आजार असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत. शिंकताना, खोकतांना नाक व तोंडावर रुमाल धरावा. हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार स्पर्श करू नये. फळे, भाज्या न धुता खाऊ नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी दुकाने व आस्थापनांमध्ये आवश्यक तेवढाच स्टाफ बोलावा, अनावश्यक गर्दी टाळा, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.
हॉकर्स, फेरीवाले यांनीही सुरक्षित अंतर ठेवून दुकाने मांडावीत. प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करावे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अमरावती महानगरपालिकेनेतर्फे सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की त्यांनी महानगरपालिकेत न येता महानगरपालिकेच्या ई मेल आयडी [email protected] यावर संपर्क करावा.