कुतुबमिनारच्या जागेवर मंदिर असल्याचा दावा
नवीदिल्ली दि २४ – कुतुबमिनारमधील हिंदू आणि जैन मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि नियमित उपासना हक्काच्या अर्जावर गुरुवारी दिल्लीच्या साकेत कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने या खटल्याशी संबंधित संपूर्ण माहिती सादर करण्याचा तसेच सुनावणी सहा मार्च रोजी ठेवण्याचा आदेश दिला
याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, कुतुबमिनारची कुतुवत-इस्लाम मशिद तेथील मंदिरे फोडून बांधली गेली. तेथे 27 मंदिरे होती. या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी त्यांच्यासमवेत जैन तीर्थंकर वृषभदेव आणि भगवान विष्णू यांना याचिकाकर्ता केले आहे. मोगल शासक कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात, कुतुबमिनार संकुलातील मंदिरे फोडून मशीद बांधली गेली. कुतुबुद्दीन ऐबक मंदिरे पूर्णपणे पाडू शकला नाही, म्हणून त्यातील काही भाग तोडले गेले आणि त्याच्या साहित्याने मशिदी बनवल्या. अस्तित्वातील संकुलाच्या भिंती, खांब व छतावर चित्रे आणि देवतांची प्रतिके आहेत. यामध्ये भगवान गणेश, विष्णू, यक्ष-यक्षिणी, द्वारपाल, पार्श्वनाथ, महावीर, नटराज आणि मंगल कलश, शंख, गदा, श्रीयंत्र, घंटा आणि पवित्र कमळ यांची चिन्हे आहेत. संकुलाच्या आतील आणि बाह्य रचना प्राचीन हिंदू आणि जैन मंदिरांच्या वास्तूंचे प्रतीक आहेत. कॉरिडाॅर पूर्णपणे वैदिक शैलीमध्ये तयार केलेला आहे. त्यामध्ये स्तंभांवर पवित्र शिलालेख दाखविणा-या गॅलरी आहेत.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चा छोटा इतिहासदेखील कुतुबमिनारमध्ये मंदिरे फोडून मशिदी बांधण्याचा उल्लेख करतो. केंद्र सरकारने विवादित जागेला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. सध्या एएसआय त्याची काळजी घेत आहे. याचिकाकर्त्यांच्या मागण्या केंद्र सरकारला ट्रस्ट स्थापन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, या ट्रस्टच्या प्रशासनाचे नियोजन केल्यानंतर मंदिर संकुलाचे व्यवस्थापन ट्रस्टकडे सोपवावे. दुरुस्ती, बांधकाम कामे, पूजा-अर्चा करण्यात हस्तक्षेप करण्यापासून केंद्र सरकार आणि एएसआय यांना रोखले पाहिजे, अशा आहेत.