मराठी

‘पोकरा’च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी विविध योजनांची सांगड

ग्रामीण भागाचा कायापालट होण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २३ : ग्रामीण भागाचा कायापालट (Transformation of rural areas) होण्याच्या दृष्टीने व शेतकरी बांधवांच्या उत्पन्नवाढीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत विविध योजनांची सांगड घालून अधिक परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

राज्य शासनाकडून या योजनेंतर्गत सहभागी गावातील 3800 गावांचा पाण्याचा ताळेबंद करण्यात आला आहे. पीक पद्धतीत बदलासाठी ते उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे, योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्प यासारख्या विविध योजनांची या योजनेशी सांगड घालण्याचे  धोरण शासनाने निश्चित केले आहे. शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करणे व बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे असा हेतू ठेवून पोकराची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न आहे. स्वयंसहाय्यता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपन्या, साधारण स्वारस्य गट, शेतकरी स्वारस्य गट यांची स्थापना करण्यासह त्यांचे बळकटीकरण आणि कौशल्य विकास, धान्य व फळे-भाज्या बाजार समूहाची स्थापना अशी विविध कामे त्यातून जोडली जाणार आहेत.

अमरावती जिल्ह्यात ५३२ गावांचा समावेश

योजनेतून पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत शेती फायदेशीर करणे व शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे, विभागवार पिकांचेदेखील नियोजन करून  बाजारपेठ असणाऱ्या पीक लागवडीसाठी प्रोत्साहनही देण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांत एकूण 532 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. दीर्घकालीन दृष्टीतून पीक पद्धती व शेती फायदेशीर करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे यासाठी स्थानिक पीकपद्धतीचा अभ्यास करून हवामान बदलास अनुकूल शेती निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी  जिल्ह्यातील सर्व गावे, परिसर, स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात.

जिल्ह्यात अनेक गावांचा समावेश असलेले खारपाणपट्ट्याचे क्षेत्र आहे. पोकरा योजनेचा हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती विकसित करण्याचा हेतू असल्याने दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या दृष्टीने जिल्ह्यातील गावांचे आराखडे व आवश्यक कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Related Articles

Back to top button