मराठी

आ. बंब यांच्यासह 16 जणांवर 16 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गुन्हा

औरंगाबाद/दि.१९ – भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीचा फेरफार केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आ. बंब यांच्यासह आणखी 16 जणांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत म्हटले आहे, की बंब यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार केला आहे. कारखान्यातील सभासदांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते; मात्र विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती; पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नसल्याचे बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर आता बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभासदांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button