पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी २ सप्टेंबर पर्यंत बंद
पोलीसांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढले
नागपुर/दि २७ – कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरात जिल्हा परिषद पाठोपाठ आता पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी एका आठवड्याकरीता बंद करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्तलयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर बुधवारी ४० पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पोलिस विभागात करोनाचा झपाट्याने संसर्ग होत असल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त पोलिस अधिकारी ,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. पोलिस आयुक्तालयातील चार पोलिस कर्मचाऱ्यांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तसेच पोलिसाच्या एका नातेवाइकाचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.
पोलिस दलात करोनाबाधित कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालय पुढील आठवडाभर नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम असल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६१२२२, २५६११०३ किंवा पोलिस आयुक्तालयातील २५९०६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. पोलिस आयुक्तालयाप्रमाणाचे सिव्हिल लाइन्समधील नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक कार्यालयही नागरिकांसाठी २ सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. .