वरुड दि.१४ – तालुक्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकासह शेतातील विहारी खचत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतक:याने तहसिलदाराकडे केली आहे.
तालुक्यात सुरवाती पासून पावसाची दमदार हजेरी सुरुच असून अति पावसाने शेतातील हाती आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. अशातच अति पावसामुळे शेतातील विहिरी खचण्याचे प्रमाण वाढीस असल्याने शेतक:यांच्या चिंतेत भर पडली आहे.
तालुक्यातील राजुरा बाजार येथील श्रीराम जयकृष्ण बहुरुपी नामक शेतक:यांची अमडापुर शेत शिवारातील गट क्र.१०७ मधील विहीर खचली असून विद्युत मोटार, केबल, आदी साहित्याचे नुकसान झाले आहे. परिणामी ओलितांचे साधन बुडाले असून संत्रा बागांना व इतर पिकांना सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे . विहीरमध्ये आजूबाजूचा गाळ आल्याने विहीर पूर्ण पणे बुजली असून ओलिताचे साधनच बुडाल्याने संत्रा झाडे जगवावी कशी? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. खचलेल्या विहिरीसाठी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी श्रीराम बहुरुपी यांनी तहसिलदारांकडे केली आहे.