कांद्याच्या ठराविक वाणांच्या निर्यातीला सशर्त परवानगी
नवी दिल्ली/दि.१० – गेल्या महिन्यात कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी शिथिल करून सरकारने बंगळूर गुलाब व कृष्णापूरम वाणांच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. तथापि, निर्यातीसाठी काही अटी घातल्या गेल्या आहेत. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे, की बंगळूरच्या दहा हजार टन कांद्याच्या तसेच कृष्णपूरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी तत्काळ प्रभावाने पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत वैध असेल. याशिवाय निर्यात केवळ चेन्नई बंदरातूनच केली जाईल, अशीही अट आहे. १४ सप्टेंबर रोजी सरकारने देशांतर्गत बाजारात होणारा पुरवठा वाढवण्यासाठी आणि दरातील वाढीला आळा घालण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत बाजारात बंगळूर आणि कृष्णपूरम या कांद्याची मागणी नसल्यामुळे कर्नाटकातील शेतक-यांनी दररोज दहा हजार टन बंगळूर कांद्याच्या निर्यातीला सूट द्यावी असे आवाहन केले होते. मलेशिया, qसगापूर, तैवान आणि थायलंड अशा आशियाई देशांमध्ये याची मागणी जास्त आहे. बंगळूरमध्ये दररोज कांदा निर्यात करणा-यांना त्या वस्तूचे प्रमाणपत्र व त्याचे प्रमाण कर्नाटक सरकारच्या बागायती आयुक्तांकडून घ्यावे लागेल. त्याचप्रमाणे कृष्णपूरम कांद्याच्या निर्यातदारांना आंध्र प्रदेश सरकार हे प्रमाणपत्र देईल.