
मुंबई/दि. ७ – रिझव्र्ह बँकेच्या ग्राहक आत्मविश्वास अहवालात देशातील ग्राहकांचा विश्वास फारच कमी झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे, की देशातील लोकांमध्ये नोकरी, मिळकत आणि खर्च याविषयी खूप चिंता आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या अखेरीस जगातील सर्वांत मोठी टाळेबंदी लागू केल्यापासून नागरिकांत निराशा वाढू लागली होती. रिझव्र्ह बँकेने म्हटले आहे, की ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक जुलैमध्ये आणखी कमी होऊन ५३.८ च्या विक्रमी पातळीवर आला. १०० च्या खाली निर्देशांक जितका कमी होईल, तितकी वातावरण निराशता येते. निर्देशांक शंभरपेक्षा जास्त असला, तर वातावरणात उत्साह असतो. लोक खर्च करण्याबाबत टाळाटाळ करीत नाही. सध्याच्या परिस्थितीत अनिश्चिततेचे वातावरण असल्याने लोकांनी खर्चावर बंधने घातली आहेत.
या अहवालात म्हटले आहे, की मेच्या तुलनेत सध्याची आर्थिक परिस्थिती, रोजगाराची परिस्थिती आणि त्यांचे उत्पन्न यावर ग्राहकांचा आत्मविश्वास लक्षणीय घटला आहे.रिझव्र्ह बँक दर दोन महिन्यांनी हा अहवाल जाहीर करते. सर्वेक्षण केलेल्या ब-याच लोकांनी असे सांगितले, की त्यांचे खर्च लक्षणीय घटले आहेत. पुढील वर्षीही ते वाढण्याची अपेक्षा नाही. रिझव्र्ह बँकेच्या दुस-या अहवालानुसार महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मुख्य व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेणे अवघड जाईल.
ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षणानुसार, पुढच्या वर्षी ग्राहकांना वातावरणात सुधारण्याची पुसटशी आशा दिसत आहे. रिझव्र्ह बँकेने देशातील १३ पेक्षा अधिक शहरांमधील पाच हजारांहून अधिक कुटुंबांमध्ये हे सर्वेक्षण केले. महागाई वाढीमुळे रिझव्र्ह बँकेने चलनविषयक धोरण आढावा बैठकीत व्याज दरामध्ये कोणतेही बदल केले नाहीत.