मराठी

नाथाभाऊंच्या हाती घड्याळ

उद्या राष्ट्रवादी प्रवेश

मुंबई/दि.२१  – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांसह सर्वंच जण तसे काही होणार नसल्याचे सांगत असताना खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला. शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तशी घोषणा केली. दरम्यान, आणखी काही भाजपचे आणखी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून त्यांचाही टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार असल्याचे सूतोवाच जयंत पाटील यांनी केले. खडसे यांनी आज फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असे जयंत पाटील म्हणाले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत, त्यांनाही काही दिवसांत प्रवेश दिला जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथे खडसे यांचे कौतुक करताना भाजपने त्यांच्यावर कसा अन्याय केला, याचा पाढा वाचला होता. तसेच खडसे यांनी राजकीय निर्णय घ्यायला हवा, असा सल्ला दिला होता. पवार यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर खडसे यांच्या हाती घड्याळ आले. भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलले जात असल्यामुळे खडसे पक्षावर नाराज होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेत्यांशी चर्चा केल्यामुळे या पक्षांतराच्या वृत्ताला पुष्टी मिळाली. भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या रक्षा खडसे मात्र भाजप सोडणार नाहीत. त्यांच्या मदतीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारीही पक्षात राहातील, असे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. लोकसभेची मुदत संपल्यानंतर त्यांचेही पक्षांतर होईल, असे सांगण्यात आले. भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेला खडसे यांच्याकडून प्रथम लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून ही मनपा काढून घ्यायची qकवा बरखास्त करायची, असे सूत्र असू शकते. येणाèया विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांना जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. खडसे यांना विधान परिषदेवर घेतले जाईल. राष्ट्रवादीच्या एका नेत्याला राजीनामा द्यायला सांगून त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाईल. त्यामुळे रिक्त होणा-या जागेवर खडसे यांना मंत्रिपद दिले जाईल.

डझनभर आमदार राष्ट्रवादीत ?

भाजपचे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत पाटील म्हणाले, बयाच जणांनी खासगीत खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायची इच्छा व्यक्त केली आहे. खडसे यांचे नेतृत्व जे मानतात, त्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही. कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणे परवडणार नसल्यामुळे डझनभर आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये, म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

चांगली गोष्ट आणि आनंद

मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर युती तोडण्याची घोषणा खडसे यांनी केली होती. त्यामुळे शिवसेनेचा खडसे यांच्यावर राग होता; परंतु गेल्या एक वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे सातत्याने टीका करीत होते. त्यामुळे शिवसेनेचा खडसे विरोध मावळला होता. मध्यंतरी खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाचीही चर्चा चालू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘चांगली गोष्ट आहे. खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत असतील तर आनंद आहे‘, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस यांच्यावरील नाराजीमुळे पक्षत्याग

मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे, अशी पहिली प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. विनयभंगाचा खटला दाखल करणे हे सर्वात वेदनादायी होते. फडणवीसांकडून जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप खडसे यांनी केला. राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कोणीही फोन केला नाही. माझ्यासोबत कोणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाहीत. रक्षा खडसेदेखील पक्ष सोडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button