गुजरातच्या निवडणुकीची काँग्रेसने सुरू केली तयारी
अहमदाबाद/दि. २५ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाने राज्यसभेची रिक्त झालेली जागा टिकवण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर असताना आणखी दोन वर्षांनी होणा-या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. दोन दशकांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत आठही जागा जिंकल्या.
गुजरात विधानसभेच्या 182 सदस्यांच्या निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकून बहुमत मिळवले होते. गुजरातमध्ये 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेसने आपल्या गुजरात राज्य विभागात सात महत्त्वाच्या समित्या स्थापन केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रचार, जाहीरनामा, रणनीती, कार्यक्रम अंमलबजावणी, निवडणूक व्यवस्थापन, मीडिया आणि प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. अर्जुन मोडवाडिया यांची जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रचार समितीच्या अध्यक्ष दीपक बाबरिया यांची, रणनीती समितीच्या प्रमुखपदी भरतसिंग सोलंकी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून सिद्धार्थ पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. तुषार चौधरी यांची मीडिया आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे. कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष म्हणून कादिर पीरजादा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समन्वय समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव असतील, तर गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चवडा आणि सीएलपी नेते परेश धनाणी, कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांच्यासह पक्षाच्या प्रदेश युनिटच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकून बहुमत मिळवले, तर काँग्रेसने 77 जागा जिंकल्या. त्यातील १२ आमदारांनी राजीनामे देऊन भाजपत प्रवेश केला.