नवी दिल्ली/दि. २४ – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघार घेण्याबाबत चीन(China) फारच दुराग्रही राहिला, तर भारत सैनिकी पर्यायांचा विचार करू शकतो, असा इशारा सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी दिला.
चीनसोबत भारताच्या वाटाघाटी सुरू आहेत; परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. देहळणीची काही ठिकाणे चीन खाली करायला तयार नाही. भारतालाही काही ठिकाणे खाली करावी लागतील, अशी अट चीनने घातली आहे; परंतु भारताला चीनच्या या अटी मान्य नाहीत. या पाश्र्वभूमीवर रावत म्हणाले, “लडाखमधील चिनी सैन्य दलाच्या आक्रमणांवर कारवाई करण्यासाठी लष्करी पर्याय खुले आहेत; परंतु दोन्ही देशांमधील वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि आणि मुत्सद्दी वाटाघाटी अयशस्वी झाल्यावरच या पर्यायाचा उपयोग होईल.”
हा वाद सोडविण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत दोन्ही बाजूंनी ब-याच मुत्सद्दी वाटाघाटी व सैनिकी चर्चा झाल्या, त्यामध्ये पाच लेफ्टनंट जनरल लेव्हल चर्चेचा समावेश आहे; परंतु या वादावर तोडगा काढण्यात अद्याप कोणतीही प्रगती झालेली नाही. भारतीय सैन्याने चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही बदल होऊ देणार नाही, असे ठणकावले आहे. चीनला आक्रमित क्षेत्र सोडावे लागेल आणि पाच मे पूर्वीच्या स्थितीत जावे लागेल. टेहळणीची काही ठिकाणे सोडण्यास चीन तयार नाही. चीनच्या कोणत्याही युक्तीला सामोरे जाण्यासाठी भारतानेही आपल्या वतीने पूर्ण तयारी केली आहे. लष्करी कमांडर्सनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कमांडिंग अधिका-यांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या चकमकीत 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. 40 हून अधिक सैनिक चीनमधूनही मारले गेले. तथापि, चीनने हे कधीही स्वीकारले नाही.