अमरावती, दि. 10 : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे, काही ठिकाणी म्युकरमायकोसीस आजाराचाही प्रादुर्भाव आढळला आहे. त्यानुषंगाने ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. तिसऱ्या लाटेसदृश स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तो रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढत आहोत. आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. या उपचार सुविधांत भर घालताना लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याचबरोबर नव्याने उभ्या राहणा-या अडचणींवर आपण वेळीच मात केली पाहिजे. साथीबाबत जराही गाफील राहून चालणार नाही.
लहान मुलांना तिस-या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये लक्षणे दिसताच त्यांच्या आरटीपीसीआर अहवालाची वाट न पाहताच उपचार सुरू करावेत. लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्ययंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात यावा. म्युकरमायकोसीस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
-
म्युकरमायकोसीसच्या रूग्णांवर म. फुले जनआरोग्य योजनेत उपचार
म्युकरमायकोसीस आजाराच्या जाणीवजागृतीबाबत मोहिम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या आजारावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रूग्णालयांमध्ये या आजाराच्या रूग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे व त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार झाले नसल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रूग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणा-यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.