मराठी

कांदा निर्यातबंदीचा पाकला फायदा

बंदी उठविण्याची मागणी

नगर/दि. १६ – आपण कांदा निर्यात बंदी केल्यामुळे पाकिस्तानची कांदा निर्यात वाढेल, याचा फायदा पाकिस्तानमधील कांदा उत्पादकांना होणार आहे, याचा केंद्र सरकारने विचार करायला हवा. त्यामुळे निर्यात न थांबवता, निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला केली आहे.
कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तरांतून विरोध केला जात आहे. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी या विरोधात आहे. टाळेबंदी काळात संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना शेतकऱ्याने कष्ट करून, मेहनत करून, शेतात राब राब राबत कृषी अर्थव्यवस्था सुरू ठेवली. जनतेला भाजीपाला तसेच कृषी उत्पादनांची कमतरता भासू दिली नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांच्याप्रमाणे शेतकरीदेखील कोरोना योद्धे आहेत, असे सांगून ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळला नसता तर उणे २३ टक्के घसरलेला जीडीपी उणे ३० टक्यांच्या खाली गेला असता, किमान याची तरी केंद्र सरकारने जाण ठेवायला हवी.
पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. त्यामुळे दळणवळण खर्च वाढला आहे त्याचा परिणाम महागाईवर होताना दिसत आहे. दिवसरात्र एक करून संपूर्ण कुटुंबासह शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो, उत्पादन घेतो. त्यांना इतके कष्ट घेऊनदेखील योग्य मोबदला मिळत नाही. त्यांच्या हक्काचा पैसा हा इतर खर्चात जात आहे. त्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा हा त्याचा अधिकार आहे, याचा केंद्र सरकारने विसर पडू देऊ नये. जेव्हा कधी कांद्याचे भाव पडतात, शेतकऱ्याचा कांदा अक्षरशा सडतो, फेकला जातो, तेव्हा मात्र निर्यात अनुदान वाढवून निर्यात वाढीसाठी केंद्र सरकार कधी प्रयत्न करत नाही आणि आज शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतायत त्यात हरकत काय आहे, असा सवाल पवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

Related Articles

Back to top button