मराठी

कोरोनाने सार्वजनिक आरोग्याचे महत्व समस्त जगापुढे ठळक केले

- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम

अमरावती/दि. 6 – सार्वजनिक आरोग्याच्या जपणुकीबाबत जगभर सर्वत्र बोलले जाते. मात्र, त्याकडे अनेक देशांचे दुर्लक्षच होत आले. मात्र, कोरोना साथीने सार्वजनिक आरोग्याच्या जपणुकीचे महत्व समस्त जगापुढे ठळक केले, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या पूर्वसंध्येला सांगितले.
ते म्हणाले की, पहिला जागतिक आरोग्यदिन 7 एप्रिल 1950 रोजी साजरा झाला. आरोग्य, माता आणि बालसंगोपन व पर्यावरणातील बदल  अशा विविध विषयांवर जागतिक आरोग्य संघटनेने जनजागृती केली आहे व अनेक देशांना या समस्येवर उपायांची अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच मानसिक आरोग्य, माता व बालमृत्यू कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आदींबाबत अनेक राष्ट्रांकडून, तसेच जागतिक पातळीवर विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.
  • आजार नसणे म्हणजे ‘फिट’ असणे असे नाही

डॉ. निकम पुढे म्हणाले की, चांगले आरोग्य म्हणजे केवळ आजारी किंवा अशक्त नसणे असे नाही. चांगले आरोग्य म्हणजे संपूर्ण शारिरीक, मानसिक आणी सामाजीकरित्या स्वस्थ असणे होय. तशी व्याख्या आरोग्य संघटनेने केली आहे व गत सात दशकांपासून ही संघटना आरोग्याची खरी व्याख्या प्रत्यक्षात आणण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करत आहे.

 

  • कोरोनाने धडे दिले

बहुतेक गरीब आणी विकसनशील राष्ट्रे पुरेशा संसाधनांअभावी सार्वजनिक आरोग्यावर मोठा खर्च करु शकत नाहीत ‍किंवा आरोग्य या विषयाला प्राथमिकता दिली जात नाही. मात्र, कोरोनाने आता सर्वांना सार्वजनिक आरोग्याचे महत्व पटवून दिले आहे. सार्वजनिक आरोग्य व आरोग्य संस्थांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे दुष्परिणाम संभवतात. दर 100 वर्षांनी जगात महामारी येते आणि त्यात कोट्यवधी व्यक्ती बाधित होतात, लक्षावधी मृत्युमुखी पडतात हे इतिहासाने दाखवून दिले आहे. त्यामुळे कोरोनानंतर अनेक बदल होत आहेत. आरोग्याला प्राथमिकता मिळून अनेक नव्या गोष्टी उभारल्या जात आहेत.
चांगले आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत हक्क आहे. कोविड महामारीनिमित्ताने सार्वजनिक आरोग्य संस्थांचा कायापालट होऊ घातला आहे जेणेकरून तळागाळातील व्यक्तींसह सर्वांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल. जगातील सर्व देशांना हे करणे क्रमप्राप्त आहे. यात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचीही तेवढीच गरज असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.
  • निरामय आरोग्याचा सूर्य प्रकाशमान होवो

‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात’, असे पसायदान संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिले आहे. त्याप्रमाणे, रोगराईचा अंधार नष्ट होऊन निरामय आरोग्याचा सूर्य प्रकाशमान होवो व सर्व मानवजातीची चांगल्या आरोग्याची इच्छा पूर्ण  होवो, अशी प्रार्थना करून डॉ. निकम यांनी सर्वांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी 7 एप्रिल जागतिक आरोग्यदिन साजरा होतो. याच दिवशी सन 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्राची शाखा असून, मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या घेऊन ही संघटना दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर करते आणि त्याला अनुसरून वर्षभर कार्यक्रम राबवते. ‘सर्वांसाठी सुसंस्कृत व निरामय जगाची निर्मिती’ असे यंदाचे घोषवाक्य आहे._

Related Articles

Back to top button