देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोना पथके रवाना
नवीदिल्ली/दि.२२ – केंद्र सरकारने आज उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी उच्चस्तरीय पथके पाठविली आहेत. या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक वाटावी, एवढी वाढली आहे. देशातील अनेक राज्यांत परिस्थिती अधिकच वाईट होत चालली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यात प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.
देशातील कोरोना साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. यापूर्वी, कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने गुजरात, राजस्थान, हरयाणा आणि मणिपूर येथे विशेष आरोग्य पथके पाठविली. यासह छत्तीसगडमध्ये विशेष पथके रवाना झाली आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळसह देशातील ब-याच राज्यांत यापूर्वी कोरोना प्रकरणांचा उद्रेक होता. त्यामुळे देशात कोरोना संक्रमणाचा धोका वाढल्याचे दिसते. यावर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. केंद्र सरकार दिल्लीत मदत करण्यासाठी पुढे आली असून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. पूर्वी दिल्लीत कोरोनाची नवीन प्रकरणे सतत वाढत गेली. येथे दररोज सुमारे 100 मृत्यू होतात, तर दररोज सुमारे 5-7 हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की कोरोनाबाधितांची संख्या ज्या जिल्ह्यांत सर्वांत वेगाने वाढत आहेत, त्या जिल्ह्यांना तीन सदस्यीय संघ भेटी देतील. ही पथके देखरेख, चाचणी, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपाय आणि कोरोना पॉझिटिव्ह घटनांचे कार्यक्षम व्यवस्थापन या दिशेने राज्यांना मार्गदर्शन करतील. वेळेवर उपचार आणि पाठपुरावा संबंधित आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी केंद्रीय पथके सल्ला देतील. दिल्ली आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. दिल्लीतील कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्या कमी झालेली नाही. दिल्लीत गेल्या 24 तासांत 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात एका दिवसात 5640 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 17 लाख 68 हजार 695 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत येथे 155 लोक मरण पावले आहेत.