मराठी

चार महिन्यांत गेल्या दोन कोटी नोक-या राहुल गांधी यांची टीका

अर्थव्यवस्थेचे सत्य द्वेषाने लपत नाही

नवी दिल्ली/दि. १९ – फेसबुकवर खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वनाशाचे सत्य देशापासून लपवता येत नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे दोन कोटी लोकांच्या नोकरया गेल्या तसेच दोन कोटी कुटुंबांचे भविष्य अंधारात आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

राहुल यांनी आपल्या ट्विटसोबत एक बातमीही पोस्ट केली आहे. या वृत्तात एप्रिल २०२० पासून ते आतापर्यंत एक कोटी ८९ लाख नोकरया गेल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल यांनी यापूर्वी भारत-चीन सीमावाद, कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यात सरकारचा नाकर्तेपणा आणि पीएम केअर फंडासारख्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. १६ ऑगस्टला राहुल यांनी भारत-चीन सीमावादावर ट्विट केले होते. पंतप्रधानांना सोडून भारतातील प्रत्येकजण भारतीय लष्कराच्या शौर्यावर आणि क्षमतेवर विश्वास ठेवतो. पंतप्रधानांच्या डरपोकपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांच्या खोटे बोलण्यामुळे चीनने बळकावलेली भारताची जमीन आपल्याकडेच ठेवण्याची संधीच मिळाली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

१४ ऑगस्ट या दिवशी आणखी एका ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. केंद्र सरकार लडाखमध्ये चिनी कारवायांचा सामना करण्यासत घाबरत आहे. चीन स्वत:ला तयार करत आहे, असे चीनच्या हालचालींवरून दिसत आहे, असे राहुल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते. पंतप्रधानांमध्ये व्यक्तिगत धैर्याची कमतरता असून प्रसारमाध्यमेही या प्रकरणावर मौन बाळगून आहेत, याची भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राहुल यांनी दिला होता.

Back to top button