मराठी

लाइटवेट ज्वेलरीला सध्या मागणी

मुंबई/दि.५  – नवरात्रीपासून तेजीत असलेल्या सोने बाजारात अद्याप नववधूचा साज असलेल्या ज्वेलरीला फारशी मागणी नसली, तरी लाइटवेट ज्वेलरीचा ट्रेंड आहे. यात सोनसाखळीला सर्वाधिक मागणी आहे. कमी वजनाची (8-10 ग्रॅम) सोनसाखळी व त्यानंतर फॅशनेबल नेकलेस, पेंडंट, इअररिंग्ज, मंगळसूत्र, कडे, बांगड्यांना मागणी वाढली आहे.
राज्यात सुमारे 30 हजार किरकोळ विक्रेते सराफा व्यावसायिक आहेत. 2019 च्या तुलनेत यंदा 50 ते 60 टक्के व्यवसाय होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले, की सोन्याचा दर 53 हजार 500 रुपये प्रतितोळ्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत ते 59 हजार रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता आहे. राज्यात सोने बाजारातील सर्वात जास्त उलाढाल मुंबईच्या जव्हेरी बाजारात होते. येथील झळाळी परतली आहे. मुंबईनंतर पुणे, जळगाव, औरंगाबाद, नागपूरचा क्रमांक लागतो.
सुवर्णनगरी जळगावात दसर्‍यानंतर ग्राहकांचा कल वाढल्याने लाइटवेट दागिन्यांच्या खरेदीत दिवाळीपर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त उलाढालीचे संकेत आहेत. 3 ग्रॅम, 5 ग्रॅम ते 10 ग्रॅमपर्यंतचे लाइटवेट दागिने जसे इअररिंग्ज, चेन, ब्रासलेट्सला जास्त पसंती आहे. यंदा दिवाळीला साडेतीन ते चार टनांपर्यंत सोन्याची विक्री होईल असा अंदाज आहे. एकट्या मुंबईत महाराष्ट्राच्या 40 टक्के व्यवहार होतो. जव्हेरी बाजारातून मालाचा सर्वदूर पुरवठा होतो. येथून दक्षिण भारतात जास्त खरेदी केली जाते. दिवाळीनिमित्त 15 ते 20 ग्रॅमपर्यंतच्या लाइटवेट ज्वेलरीला खूप मागणी आहे. दिवाळीनंतर सोन्याचे भाव 6-7 हजारांनी वाढतील.
पुण्यासारख्या शहरात उच्च वर्गातील खरेदीदारांमध्ये पोलकी, कट डायमंड, कुंदन, गेरू पॉलिश्ड डिझाइनच्या दागिन्यांची मागणी आहे. पिवळेधमक दिसतील अशा दागिन्यांची निवड साधारण मध्यमवर्गाकडून होते.

Related Articles

Back to top button